पुणे : शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून कुटुंबीयाला मारहाण केली. ही घटना हडपसरमधील महंमदवाडीत घडली. याप्रकरणी नीलेश शहाजी एडके, मिलिंंद शहाजी एडके, वृक्षना एडके (सर्व रा. साठेनगर, महंमदवाडी रस्ता ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लक्ष्मण धोडिंबा भंडारे (वय ५५, रा. साठेनगर, महंमदवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एडके आणि भंडारे एकाच परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण यांचा मुलगा मद्यपान करून आल्यानंतर घरात भांडण करीत होता. त्या वेळी आरोपी नीलेश आणि मिलिंंद यांनी लक्ष्मण यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यामुळे सचिन भंडारे यांनी आरोपींकडे शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी सचिनला मारहाण केली. त्यानंतर नीलेशने लक्ष्मण यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर लक्ष्मण तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेले असता, आरोपींनी त्यांच्या घरावर दगड फेकून मारले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.