पुणे : कांदा, साखर आणि सर्व शेती मालावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी तसेच सरकट कर्ज आणि वीजबील मुक्ती मिळावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी आज शेतकरी संघटनेतर्फे पुणे येथे भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला. पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी अंगावर आसूड ओढून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
या मोर्चाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते, बाळासाहेब घाडगे, पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वस्तादभाऊ दौंडकर, युवा आघाडी अध्यक्ष बाबासाहेब हारगुडे भगवान जगताप उपस्थित होते. या मोर्चात शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, दौंड, जुन्नर अशा विविध तालुक्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी राष्ट्रपतींना देण्यासाठीचे मागण्यांचे निवेदन सुपूर्त करण्यात आले. कीटकनाशके, बियाणे, ट्रॅक्टर, कृषी यंत्रे इत्यादींवरील जीएसटी हटवावा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. तसेच व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करतात आणि त्यावरील जीएसटी शेतकऱ्यांडून वसूल केला जातो, त्याचा भार व्यापाऱ्यांनी सहन करावा, अशी तरतूद करण्यात यावी. सरकारने शेतमालाची खरेदी निश्चित करावी आणि नाशवंत उत्पादनांसह सर्व कृषी उत्पन्नांना किमान आधारभूत किंमत देण्यात यावी. अशा मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत.