नसरापूर : भोर व वेल्हा तालुक्याला जोडणारा नसरापूर फाटा ते नसरापूर गाव या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम झाले होते. मात्र काही वर्षातच रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पुन्हा सुरू झाले असून यावेळीही खड्ड्यात डांबर अतिशय कमी व खडी प्रचंड जास्त प्रमाणात टाकण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
भोर व वेल्हा तालुक्याला जोडणारा नसरापूर गावामधून जाणाऱ्या रस्ता अतिशय खराब झाला आहे. येथील खड्डे अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमीच वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वेल्हा तालुक्यातील स्वराज्याचे साक्षीदार तोरणा व राजगड किल्ले, निसर्गरम्य मढेघाट, बनेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्यावर वाहतुकीची व अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्या ७ ते ८ वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झाले होते. तेव्हापासून रस्त्यालगत न वापरलेली खडी तशीच पडून आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण झाले होते की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय झाला आहे. सध्या सुरू केलेल्या डागडुजीमध्येही डांबर कमी आणि ऑइलचे प्रमाण जास्त असल्याची तक्रार येत आहे. डांबर कार्पेटची जाडी खूपच कमी असल्यामुळे काम सुरू असतानाच रस्त्यावरील डांबराचा थर अनेक ठिकाणी उखडून गेलेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. विशेष म्हणजे येथील लोकप्रतिनिधींचेही या कामाकडे लक्ष नाही. त्यामुळे कंत्राटदाराचे चांगलेच फावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खडीकरण व डांबरीकरण होत आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची आहे. गुणनियंत्रण विभागाने या संदर्भात दक्ष राहिले पाहिजे. परंतु, कंत्राटदार व अभियंता यांच्यातील ‘आपुलकी’तून अभियंता या कामांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कमीत कमी या रस्त्याची गुणवत्ता पाहणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. त्यामुळे रस्ते बांधकामावर मोठे बजेट असतानाही कामे मात्र निकृष्ट होत असल्याचे चित्र विदारक आहे.
--
वाहनासह शरीराचेही होतेय नुकसान
--
निकृष्ट कामामुळे काही काळातच हा रस्ता वाहन चालविण्यास धोकादायक ठरला आहे. रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे वाहने तर खिळखिळी होत आहेतच, शिवाय प्रवाशांच्या पाठीच्या मणकाही खिळखिळा होत आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करावी व संबंधित कंत्राटदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करावी. तसे न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा नसरापूरसह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
--
फोटो क्रमांक - २८ नसरापूर खडीभरण काम निकृष्ट
फोटो ओळी : भोर तालुक्यातील नसरापूर-वेल्हा रस्त्यावर अनेक ठिकाणी सुरू असलेली डागडुजी.
===Photopath===
280521\28pun_5_28052021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक - २८ नसरापूर खडीभरण काम निकृष्टफोटो ओळी : भोर तालुक्यातील नसरापूर - वेल्हा रस्त्यावर अनेक सुरु असलेले डागडुजी