शेलपिंपळगाव : शेलगाव-आळंदी (ता. खेड) रस्त्यावर वडगाव-घेनंद हद्दीतील मुख्य चौकात डांबरीकरण उखडले असून, रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिकांकडून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे याबाबत दुरुस्तीची मागणी करूनही संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदीला तसेच विश्रांतवाडीमार्गे पुण्याला जाण्यासाठी शेलगाव हद्दीतून रस्ता आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे प्रवासी तसेच आळंदीला येणारे भाविक त्रस्त झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र वडगाव-घेनंद हद्दीत ठिकठिकाणी रस्ता उखडला गेला, तर काही ठिकाणी पूर्वीचे खड्डे पुन्हा तयार झाले आहेत.
विशेषतः पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत असल्याने वाहन चालविताना अनेकांना अंदाज येत नाही. चालू आठवड्यात तीन-चार दुचाकींना या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहेत. परिणामी ही वाट प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांना बिकट झाली आहे.
दरम्यान, येथील ॲड. शाम बवले यांनी ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले आहे.
संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून देण्याची मागणी सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, माजी उपसरपंच मारुती बवले, माजी ग्रामपंचायत सदस्य चरणदास नितनवरे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बवले, ॲड. शाम बवले, ग्रामपंचायत सदस्य अमोल नितनवरे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष तुषार बवले आदींसह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.
३१शेलपिंपळगाव
वडगाव-घेनंद (ता. खेड) येथे मुख्य चौकात रस्त्यावर पडलेले खड्डे दाखविताना ग्रामस्थ. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)