ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - पुण्याची युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणेने कारकिर्दीतील एक मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे. रशियातील कान्ट-मॅन्सियस्क येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
११ फेरींच्या या स्पर्धेत आकांक्षाने ९ गुणांसह बाजी मारली. अखेरच्या फेरीत पोलंडच्या स्लिव्हिस्का अॅलिसावर निर्णायक विजय मिळवून तिने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. इराणची अॅलिनासाब मोबिनाला ८.५ गुणांसह उपविजेतेपदावर, तर रशियाच्या शुवालोवा पोलिनाला तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताच्याच प्रियांकाने आठवे स्थान प्राप्त केले.