पुणे : शहराच्या विविध भागात उभारलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरती वाट लागली आहे. यावर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केलेले असतानाच आता शहरात ११ ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी दाेन कोटी ७६ लाख ९५८ रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या स्वच्छतागृहांमध्ये दहा सीट असतील तसेच ६०० ते ७०० स्क्वेअर फूट जागेत ही प्रशस्त स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत.
राज्य सरकारने मोठ्या शहरामध्ये आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहासाठी राज्य सरकारकडून प्रति सीट दीड लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना विविध महापालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत खराडी येथे हे स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून हे काम सलीम मुसा संदे यांना २१ लाख ४२ हजार २३४ देण्यात आले आहे. भेकराई जकात नाका येथील स्वच्छतागृहाचे काम पूजा कन्स्ट्रक्शनला २३ लाख ५५ हजार, वाघोली येथील स्वच्छतागृहाचे काम सलीम मुसा संदे यांना २३ लाख ५५ हजार तर लोहगाव येथे स्वच्छतागृहाचे काम श्रीगणेश कन्स्ट्रक्शनला २१ लाख ९० हजार यांना देण्यात आले आहे. येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आंबेडकर चौक येथे स्वच्छतागृहाचे काम सचिन कन्स्ट्रक्शन यांना २३ लाख ८४ हजार, हाय स्टीट बालेवाडी येथे स्वच्छतागृहाचे काम सचिन कन्स्ट्रक्शन यांना २६ लाख ५९ हजार, ससून रोड येथील स्वच्छतागृहाचे काम सोहम कन्स्ट्रक्शन यांना २४ लाख ९० हजार रुपयांना देण्यास मान्यता देण्यात आली. वारजे हायवे चौक चौधरी उद्यान येथील स्वच्छतागृहाचे काम अर्बन स्पेस यांना २२ लाख २९ हजार, रामटेकडी इस्टीयल एरिया येथे स्वच्छतागृहाचे काम अलकुंटे ब्रदर्स यांना २९ लाख ८७ हजार ७४४, म्हात्रे पूल एसटीपी कॉर्नरजवळील स्वच्छतागृहाचे काम अर्बन स्पेस यांना २९ लाख ८७ हजार, शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत रूपाली हॉटेलजवळील स्वच्छतागृहाचे काम कविता एंटरप्रायजेस यांना २८ लाख ९४ हजार रुपयांना देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
उधळपट्टी तर ठरणार नाही ना?
पुणे महापालिकेने यापूर्वी शहराच्या विविध भागांत सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे; पण यामधील बहुतांश स्वच्छतागृहांची अक्षरश: पुरती वाट लागली आहे. या स्वच्छतागृहाची देखभाल आणि दुरुस्तीदेखील व्यवस्थितपणे होत नाही. अनेक ठिकाणी फरशा तुटलेल्या आहेत. या स्वच्छतागृहांच्या भिंती पान आणि गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. त्यामुळे या स्वच्छतागृहांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करणे ही उधळपट्टी तर ठरणार नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आकांक्षी स्वच्छतागृह असे असेल
आकांक्षी स्वच्छतागृहात एकूण १० सीट असणार आहेत. या स्वच्छतागृहाचे क्षेत्रफळ ६०० ते ७०० स्क्वेअर फूट आहे. या स्वच्छतागृहामध्ये पुरुष, महिला, ट्रांन्सजेन्डर, अपंग, लहान मुले यांच्यासाठी सीट असणार आहेत. मुलांसाठी कमी उंचीचे भारतीय पद्धतीचे शौचालय असणार आहे. या स्वच्छतागृहाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हॅड ड्रायर आणि पेपर नॅपकिनची सोय असणार आहे. महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन असावी. इन्सीनरेटर किंवा सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन असणार आहे. शौचालय इमारती बाहेर प्रवेशद्वारासमोर फलट लाइट किंवा मर्कुरी व्हेपर लाइटची सुविधा असणार आहे. तसेच सुविधेबाबत अभिप्राय नोंदणीची व्यवस्था येथे केली जाणार आहेत. यासाठी एसएमएस किंवा आयसीटी प्रणालीचा वापर केला जाणार आहे. शौचालयाच्या परिसरात एटीएम किंवा तत्सम सुविधा देण्यात येणार आहेत.