पुणे : एकतर्फी प्रेमातून एकाने महिला आणि तिच्या सासूवर हल्ला केल्याची घटना कोंढवा भागात घडली. पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीने महिलेच्या सासूच्या डोक्यात सिलिंडर मारल्याने दुखापत झाली. याप्रकरणी भीमाशंकर (पूर्ण नाव समजलेले नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात सहायक परिचारिका आहे. आरोपी भीमाशंकर हा देखील त्याच रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे. गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर महिलेला त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून तिचा पाठलाग करायचा.
महिला कोंढवा भागात राहायला आहे. आरोपी तिच्या घरी गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे त्याने सांगितले. तेव्हा मी विवाहित असून, मला दोन मुले आहे, असे तिने सांगितले. त्यावेळी महिला, तिचा मुलगा, सासू, जाऊ घरात होते. मला त्रास देऊ नको, असे तिने त्याला सांगितले. त्यानंतर आरोपी भीमाशंकर याने महिलेच्या घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सासूने त्याला जाब विचारला. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी घरात असलेल्या जावेने खोलीचा दरवाजा बंद केला. तिने परिसरातील रहिवाशांना या प्रकाराची माहिती दिली.
आरडाओरडा ऐकून रहिवासी तेथे जमा झाले. तेव्हा बंद खोलीत असलेल्या भीमाशंकरने सिलिंडरने दरवाजा तोडला. त्यावेळी सासू, महिलेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. महिला आणि सासूवर भीमाशंकरने सिलिंडर फेकून मारण्याचा प्रयत्न केला. झटापटीत सिलिंडर महिलेच्या सासूच्या डोक्याला लागल्याने दुखापत झाली. दरवाजा उघडून तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या भीमाशंकरचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरिक्षक विकास बाबर पुढील तपास करत आहेत.