पिंपरी : महापालिकेतील अर्थपूर्ण विषयावरून राष्ट्रवादीत गटबाजी होत असून, गेल्या दोन महिन्यांपासून वाकड येथील पार्क स्ट्रीट, आरक्षणातील जागांची अदलाबदल, तसेच एका संस्थेला भूखंड देण्याच्या विषयावरून एकमत होत नसल्याने गणसंख्येअभावी महापालिकेची सभा दुसऱ्यांदा तहकूब ठेवण्यात आली. महापालिका सभेत मौनी नगरसेवकांची संख्या अधिक आहे आणि हजेरी पुस्तकावर सह्या करून सभागृहाबाहेर पडणाऱ्या सदस्यांचीही संख्या अधिक असते. हजेरी पत्रकावर सह्या करून गायब झालेल्या सदस्यांचा मुद्दा शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी उपस्थित केला. गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी सदस्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे महापौरांनी ही सभा २० आॅक्टोबर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब ठेवली आहे. (प्रतिनिधी)महापालिकेला देवच वाचवू शकतोउद्यानातील बांधकामांच्या मुद्द्यावर आर. एस. कुमार म्हणाले, ‘‘उद्यानातील बांधकाम आणि प्लॉटबाबत प्रशासनाकडून माहिती दडविण्याचे काम केले जात आहे. आयुक्तांचे भूमी आणि जिंदगी विभागाकडे लक्ष नाही. या विभागात कोणताही ताळमेळ नाही. साई उद्यानाचा विषय उपस्थित झाला. अनेक उद्यानांच्या जागेत विविध बांधकामे आहेत. एका ठिकाणी हॉटेलही आहे. कोणताही विषय आला की, आयुक्त चौकशी लावतात. चौकशीत ज्युनियर इंजिनिअरवरच कारवाई होते. या महापालिकेला आता देवच वाचवू शकतो.’’शीतल शिंदे म्हणाले, ‘‘प्रशासनाची उत्तरे दिशाभूल करणारी आहेत. उत्तरात तफावत आहे.’’ तानाजी खाडे म्हणाले, ‘‘मोकळ्या प्लॉटवर झाडे कोणती लावायची, याबाबत महापालिकेने नियोजन करायला हवे. झाडांची ओळख होईल, अशा पाट्या लावायला हव्यात.’’ सुरेश म्हेत्रे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावात उद्याने नाहीत. सर्व प्रभागांत उद्याने व्हायला हवीत. नागरिकांच्या सोईसाठी उद्यानांत सुविधा पुरविण्यात गैर काहीच नाही. नागरिकांच्या सोईसाठी विरंगुळ्याची साधने हवीत.’’
गणसंख्येअभावी सभा पुन्हा तहकूब
By admin | Published: September 29, 2016 6:00 AM