नारायणगाव : स्व. आ. वल्लभशेठ बेनके यांनी घेतलेले सेवेचे व्रत मी आमदार झाल्यापासून चालू ठेवले आहे. मी तालुक्याचा आमदार असलो तरी जबाबदारीचे भान ठेवून पक्षभेद न करता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे पक्षीय कार्यकर्त्यांनी निधीची मागणी केली. पक्ष बाजूला ठेवून विकास हा मुद्दा सोबत घेऊन सगळ्यांना मदत केली, शरद पवार हे बेनके कुटुंबाचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाणार आहोत, असे प्रतिपादन जुन्नरचे आ. अतुल बेनके यांनी केले. दरम्यान, आ. अतुल बेनके यांनी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून बेनके परिवार, मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना ४५ हजार वह्यांचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे.
आ. बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्याचे हित लक्षात घेऊन अजित पवार यांच्याकडे जाण्याचे पाऊल टाकले आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. माझ्याबद्दल काही लोक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. स्व. वल्लभ बेनके यांनी २००९ साली चिल्हेवाडी पाइपलाइनचे काम चालू केले होते, ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे चिल्हेवाडीच्या पाइपलाइनचे काम पूर्ण करून पूर्व भागातील भागाला पाणी मिळणार आहे. लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे ही माझी चूक आहे का ? असा प्रती सवाल आ. बेनके यांनी व्यक्त केला.
गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न
वडज उपसा सिंचनच्या माध्यमातून ३५.५ कोटी खिलारवाडी व सात ते आठ वाड्या-वस्त्यांना व गावांना फायदा होणार असून, पाचशे हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येणार असणारी कामे मंजूर केली, अणे पठार दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कुकडीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता ज्या प्रमाणात आहे त्यामध्ये अणे पठाराचा समावेश व्हावा यासाठी डीपीआरसाठी ७६ लाख मंजूर करून आणले ही माझी चूक झाली का ? असा प्रश्न आ. बेनके यांनी गैरसमज निर्माण करणाऱ्यांना केला.
तुमच्या मनासारखे होईल
शरद पवार हे बेनके कुटुंबाचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाणार आहोत असे जाहीर वक्तव्य आ. अतुल बेनके यांनी आपल्या वाढदिवसाच्या सत्कारप्रसंगी केले आहे. १९ जुलैला शरद पवार हे नारायणगाव येथे आले असता बेनके यांनी त्यांची जाहीररीत्या भेट घेतली होती. अधिवेशन काळात आ. रोहित पवार यांच्याशी संवाद साधला होता. या सर्व घटना आणि शरद पवार यांच्याप्रति असलेली श्रद्धा ते जाहीररीत्या व्यक्त करीत आहेत. विधानसभा निवडणूक शरद पवार गट की अजित पवार गटाकडून लढविणार या पत्रकारांच्या एका प्रश्नावर त्यांनी “तुमच्या मनासारखे होईल” असे उत्तर देऊन येणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लढविणार असे स्पष्ट संकेत दिले.