पुणे : गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात २ हजार १६५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आली आहे़ त्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांची सर्वाधिक १ हजार ८०० रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे़ पोलिसांकडून आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या माध्यमातून सुरु केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली़
गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी घेतला़ त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली़ यावेळी सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अतिरक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, रवींद्र सेनगांवकर, साहेबराव पाटील तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते़
शुक्ला यांनी सांगितले की, ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात १०६ आरोपींना अटक केली आहे़ फसवणूक करणाºया आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे़ त्यात डी़ एस़ कुलकर्णी, टेम्पल रोझ कंपनी, धनदा कॉर्पोरेशन यांचा प्रामुख्याने समावेश आहे़ टेम्पल रोझ कंपनीची ३०० कोटी रुपयांची मालमत्ता, फडणीस प्रॉपर्टी ३० कोटी रुपये, धनदा कॉर्पोरेशनची १० कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्याची प्रक्रिया पार पडली आहे़
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ
शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून २०१६ मध्ये १६३ गुन्हे दाखल झाले होते़ त्यात दुप्पटीने वाढ होऊन २०१७ मध्ये ३२५ गुन्हे दाखल असून त्यात ९७ जणांना अटक करण्यात आली़ त्यात ९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे़ सायबर क्राईम सेलकडे २०१७ मध्ये ५ हजार ७४१ तक्रार अर्ज मिळाले होते़ त्यातील ५२८ अर्ज गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले़ सायबर सेलकडून ५२ गुन्हे उघडकीस आले असून त्यात ६ कोटी ७९ लाख १६ हजार ४७६ रुपये हस्तगत करण्यात आले़
सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यातील तांत्रिक अडचणीबाबत पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठविला असून त्याची पुर्तता होत नाही तोपर्यंत सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करू शकत नाही़ त्यामुळे पोलिसांनी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती मोहिम हाती घेतली आहे़ वुई फाईट सायबर क्राईम हा उपक्रम हाती घेतला आहे़
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा प्रस्ताव सरकारकडे
पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे़ स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा निर्णय सरकारवर अवलंबून आहे़ शहरातील लोकसंख्या वाढते आहे़ त्यासाठी जास्त पोलिसांची आवश्यकता आहे़ पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास पोलिसांची संख्या वाढेल, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले़