लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : नसरापूर येथील मुस्लिम समाजाने भोर तालुक्यातील पाच कोविड सेंटरमधील उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना आरोग्य साहित्य देवून आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूशी लढताना शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना नसरापूर येथील मुस्लिम समाज मदतीसाठी धावून येऊन खारीचा वाटा उचलला आहे, असे मत भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी नसरापूर येथील जामा मस्जिद येथे व्यक्त केले.
रमजान ईद सण उत्साहाने साजरा करण्याऐवजी अत्यंत साधेपणाने साजरा करून त्यातील बचत झालेल्या रकमेतून भोर तालुक्यातील भोर येथील तीन तर ससेवाडी, धांगवडी येथील कोविड सेंटरला उपचार घेत असलेल्या रुग्णांकरीता वाफेची मशिन, सॅनिटायझर व मास्क हे आरोग्य साहित्य भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष हनीफभाई शेख, उपाध्यक्ष बशीरभाई मणेर, समीर मुलाणी, शेरुभाई शेख, राजू तांबोळी, मौलाना अब्दुलवाहिद सिद्दीकी, रशीद मुलाणी, आझाद शेख, राजु शेख, निसार शेख, लिहाज शेख, नसरापूरचे उपसरपंच गणेश दळवी, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अनिल गयावळ, ज्ञानेश्वर झोरे, अनिल शेटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ : नसरापूर (ता.भोर) येथील मुस्लिम समाजाकडून रमजाननिमित्त पाच कोविड सेंटरला आरोग्य साहित्याची मदत भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.