लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोना वाढत असताना दररोज सरासरी ३०० मे. टन ऑक्सिजनची गरज लागत होती. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाट व ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक भारत फोर्ज, कल्याण स्टील आणि टाटा मोटर्स यांच्याशी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीसाठी चर्चा सुरू केली आहे. यात बहुतेक सर्वांनी मदत करण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतरुग्ण संख्या वाढली तशी ऑक्सिजनची मागणी वाढली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन मिळविण्याची वेळ आली, तर ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावे देखील लागले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने किमान पुणे जिल्हा आणि विभागाची गरज भागेल एवढा ऑक्सिजन येथेच निर्माण होईल याची तयारी सुरू केली आहे. यात पुणे जिल्ह्याची ऑक्सिजनची दैनंदिन गरज ३०० मे.टन इतकी, तर पुणे विभागाची गरज ४५० मे. टन आहे. सध्या अन्य राज्यातून ऑक्सिजन हवाई मार्गाने, रेल्वे मार्गाने, रस्ता मार्गे आणण्यात येतो. यासाठीच स्थानिक उद्योजक भारत फोर्ज, कल्याणी स्टील, टाटा मोटर्स यांचेशी ऑक्सिजन निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली. यात रुग्णांची ऑक्सिजन लेवल माॅनिटर करून ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण प्रणाली भारत फोर्ज विकसित करणार आहे. तर कल्याणी स्टीलने ऑक्सिजन साठवणुकीसाठी क्रायोजनिक टॅक उपलब्ध करून दिले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरण्यासाठीची यंत्रणा कल्याणी स्टीलकडे उपलब्ध आहे.