पुणे : इमारतीवरुन पडल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मेंदूत रक्तस्ताव झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना आज रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अशोक धुमाळ हे मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी राज्यातील विविध शहरात सेवा केली. पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस ठाण्यात त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम केले होते. गेल्या वर्षी त्यांना बढती मिळून सहायक पोलिस आयुक्त म्हणून पुणे शहर पोलिस दलात बदली झाली होती. त्यांच्याकडे फरासखाना विभाग सोपविण्यात आला होता.
अनेक गुन्ह्यांचा धडा लावण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. १५ जानेवारी रोजी सकाळी ते पाय घसरुन तिसर्या मजल्यावरुन खाली पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. मेंदूत रक्तस्ताव झाल्याने त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु असताना आज त्यांचे निधन झाले.