पुणे : ठेकेदार कंपनीकडून भविष्य निर्वाह निधीबाबत फसवल्या जाणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या तक्रारी आता भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहायक आयुक्त स्वत: ऐकणार आहेत. पालिका युनियनने यासाठी पुढाकार घेतला आहे. युनियनच्याच श्रमिक कार्यालयाच्या एकलव्य सभागृहात १५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता कंत्राटी कामगारांचा मेळावा होणार आहे.महापालिकेत ६ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत. सुरक्षा रक्षकांपासून ते कार्यालयात संगणकावर काम करणाऱ्या कारकुनांपर्यंत महापालिकेने असंख्य कामगार कंत्राटी स्वरूपात भरती केले आहेत. हे सगळे कामगार कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या कंपन्यांकडून घेतले जातात. पालिका व कंपनी यांच्यात त्यासाठी करार होतो. पालिका कंपनीला त्यासाठी दरमहा पैसे देते. त्या पैशातून कंपनीने कामगारांना वेतन करणे अपेक्षित आहे. यात कामगारांची पिळवणूक होऊ नये यासाठी सरकारने बरेच कायदे केले आहेत. त्यात प्रामुख्याने कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे, कामगारांना आवश्यक ते साहित्य पुरवणे अशा काही अटींचा समावेश आहे. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा केल्याच्या पावत्या दाखवल्याशिवाय कंपनीला त्यांचे वेतन अदा करू नये असा नियम आहे. मात्र,कंपनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटी कामगारांची पिळवणूक करते. अधिकारी त्यांना साह्य करतात. कोणी विरोध केला की त्याचे नाव कामावरून कमी केले जाते. थकबाकी दिली जात नाही. पालिका कर्मचारी युनियनने यासाठी कंत्राटी कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहायक आयुक्त अतुल कोतकर हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ते कामगारांच्या तक्रारी ऐकतील. युनियनचे अध्यक्ष उदय भट व सरचिटणीस मुक्ता मनोहर यावेळी उपस्थित असतील. कामगारांना मेळाव्यात अधिकाऱ्यांबरोबर थेट संवाद करता येईल. कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून कामगारांनी त्याला उपस्थित रहावे असे आवाहन कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड यांनी केले आहे.
सहायक आयुक्त कंत्राटी कामगारांच्या तक्रारी ऐकणार : पालिका युनियनचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 6:50 PM
महापालिकेत ६ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत
ठळक मुद्देपालिका कर्मचारी युनियनने यासाठी कंत्राटी कामगारांचा मेळावा आयोजित