पुणे : कंपनीचा विद्युत भार वाढविण्याचे काम करण्यासाठी महावितरणच्या भोसरी शाखेतील सहाय्यक अभियंताला (वर्ग २) ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अभियंत्यांवर भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
किरण गजेंद्र मोरे ( वय ३३) असे लाच स्वीकारलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार हे फ्रेंड्स इलेक्ट्रॉनिक कंपनी पुणे चे कामकाज पाहतात. कंपनीला सन राईस कंपनीचे विद्युत भार वाढविण्याचे काम मिळाले होते. विद्युत भार वाढविण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालयास अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सहायक अभियंता मोरे यांच्याकडे होता. हे काम करून देण्यासाठी मोरे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तडजोडी अंती ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक अभियंता मोरे यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करीत आहेत.