लक्ष्मण मोरे।पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांची वानवा झाली असून, राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील जवळपास ३९ पदे रिक्त झाली आहेत. या रिक्त पदांवर काम करण्यासाठी राज्यातील विविध घटकांच्या पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांद्वारे त्यांच्या युनिटमधील इच्छुकांचे अर्ज मागवून घेण्यात आले आहेत. हे अर्ज ७ आॅगस्टपूर्वी सादर करून घ्यायचे असल्याने एसीबीला घटकप्रमुखांची मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.गृह विभागाच्या अंतर्गत काम करणाºया पोलीस दलाच्या काही आस्थापनांमध्ये बदली झाल्यास त्या नेमणुकीपुरती एक टप्पा बढती दिली जाते. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये नेमणूक झाल्यास अशा प्रकारे बढती देण्यात येते. त्यामुळे एसीबीमध्ये बदली झाल्यानंतर सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदाचा दर्जा दिला जातो. तसेच, पोलीस निरीक्षकाचे वेतन दिले जाते. एसीबीकडे सध्या जलसंपदा घोटाळ्यासह अनेक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील घोटाळ्यांचा तपास सुरू आहे. नुकतेच राज्यातील ११५ पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती देण्यात आलेली आहे, तर तब्बल ७३४ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये एसीबीमधील २९ सहायक निरीक्षकांचा समावेश आहे, तर यापूर्वीची दहा पदे रिक्त होती. अशी दोन्ही मिळून ३९ पदे रिक्त झाल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे.जानेवारीपासून जुलैअखेरपर्यंत महसूल, पोलीस, पंचायत समिती, भूमी अभिलेख, महावितरण, महानगर पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, विधी व न्याय विभाग, म्हाडा, वनविभाग, शिक्षण विभाग, नगर परिषद, बेस्ट या विभागांमधील फक्त ३५ प्रकरणांमध्ये दोषसिद्धी झाली असून, ४१ आरोपींविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले आहेत.
सहायक निरीक्षकांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:20 AM