पुणे : हडपसर गाडीतळ पुलावरून दुचाकीवरून जाणाऱ्या सहायक फौजदाराच्या दुचाकीला भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत पत्नी ठार झाली. तर फौजदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या मन्मत निगडीकर (वय ४७) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती मन्मत गुरुलिंग निगडीकर (वय ५४, एसआरपीएफ ग्रुप क्र. १, रामटेकडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते या अपघातात जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्मत निगडीकर हे राज्य राखीव पोलीस दलात सहायक पोलीस फौजदार म्हणून काम करतात. रविवारी सायंकाळी दोघे पती-पत्नी हडपसर परिसरातील निळकंठेश्वर मंदिरात जात होते. त्यावेळी सायंकाळी पाचच्या सुमारास ते गाडीतळ येथील उड्डाणपुलावरून दुचाकीने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेने दुचाकी खाली पडली आणि यात विद्या निगडीकर यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मन्मत निगडीरकर हे जखमी झाले आहेत. पोलिसांकडून टँकरचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शेंडगे करीत आहेत.
टँकरच्या धडकेत सहायक पोलीस फौजदाराच्या पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 8:28 PM