पुणे: शहरातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संतोष जनार्दन म्हेत्रे (वय ५५ ) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.
संतोष म्हेत्रे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. ड्युटीवर असताना त्यांना ५ एप्रिलला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, इतर व्याधींमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. पुणे शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणी सुरु झाली असून पोलीस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. अशात सध्या शहर पोलीस दलात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला केवळ ३ ते ४ पोलिसांना लागण होत होती. आता हेच प्रमाण १५ च्या पुढे गेले आहे. सध्या दीडशेहून पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना लागण झाली असून ते उपचार घेत आहेत. आतापर्यंत सतराशेपेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १३ जणांचा मृत्यु झाला आहे.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांसाठी आता पुन्हा हॉस्पिटलमधील काही बेड राखीव ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कोरोनासंबंधी कोणती काळजी घ्यायची याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या लसीकरणानंतर आता पोलिसांच्या कुटुंबियांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. -------------------------------