लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अपघातात दररोज रक्त पाहताना, पोलिसांना वाईट वाटते, पण जेव्हा रक्ताची गरज असल्याचे समजते, तेव्हा हेच पोलीस समाजातील घटक म्हणून सामाजिक बांधिलकी मानून रक्तदानासाठी पुढे आले आहेत. भविष्यातही जेव्हा काही गरज भासेल, तेव्हा पोलीस पुढाकार घेतील, असे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.
वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभिनायाअंतर्गत शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी स्वत: रक्तदान करुन पोलिसांना रक्तदानाचे आवाहन केले.
पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, रस्त्यावरील अपघात, घटनांमध्ये पोलीस नेहमीच रक्त पहात असतात. ससून रुग्णालयात जेव्हा रक्ताची कमरता आहे, असे समजल्यावर अपघात रोखण्यासाठी जनजागृती करण्याबरोबर या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. भविष्यात जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडेल, तेव्हा पोलीस बांधव नेहमीच पुढाकार घेतील.
यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह अनेक पोलीस अधिकार्यांनी रक्तदान केले.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा अभियानात अपघात कमी व्हावेत, यासाठी पोलीस जनजागृती करीत आहेत. कोणतीही घटना घडल्यावर तेथे पोलीस सर्वप्रथम पोहचतात. जखमींना रुग्णालयात दाखल करतात. केवळ जनजागृती नाही तर प्रत्यक्ष सहभाग म्हणून यंदा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जवळपास १२० रक्तबाटल्या गोळ्या करण्यात आल्या.
रक्तदान शिबीरासाठी सहकार्य करणार्या ससून रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक शरद देसले व त्यांच्या डॉ़ सहकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.
फोटो ओळ : रस्ता सुरक्षा अभियानानिमित आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व अन्य पोलीस अधिकारी रक्तदान करताना