पुणे : आपल्या जीवनात घडणा-या गोष्टी या आपल्या मनातील प्रवृत्तीशी निगडित असतात. ज्योतिषशास्त्राच्या आहारी जाऊ नये, हे जरी सत्य असले तरी आपला प्रवास योग्य दिशेने होत आहे ना? हे सांगणारे व मनाला दिलासा देणारे हे शास्त्र आहे, असे मत माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केले.
पं. दादासाहेब जकातदार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘मंदाश्री’ पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. देसाई यांच्या हस्ते अंजली ठोंबरे व डॉ. मधुसूदन घाणेकर यांना ‘मंदाश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, मानपत्र व २५०१ रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे, संस्थेचे विश्वस्त विजय जकातदार, नंदकिशोर जकातदार, वराहमिहीर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आनंदकुमार कुलकर्णी व पुरस्कारार्थी उपस्थित होते.
चंद्रकांत शेवाळे यांनी सातत्याने २२ वर्षे हा पुरस्कार देत आहेत.या पुरस्काराचा मी साक्षीदार असून, दादा जकातदार यांच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती होती. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळण्याचा योग येणं भाग्याचे आहे, असे घाणेकर यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अंजली ठोंबरे यांनी अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राची सोदाहरण सांगड कशी घालता येते हे सांगून आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आनंदकुमार कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रतिभा मोडक व वा. ल. मंजूळ यांनी ओडिओ रूपाने संवाद साधला. नंदकिशोर जकातदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे विश्वस्त विजय जकातदार यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी चौहान यांनी सूत्रसंचालन केले. आरती घाटपांडे यांनी आभार मानले.
----------------------------------