पुणे: राज्यातील सत्ताबदलाचा संघर्ष गणेशोत्सवातील देखावा म्हणून साकारण्याचा निर्णय बुधवार पेठेतील एका मंडळाने घेतला. मात्र, पोलिसांनी त्यांना असा देखावा सादर करता येणार नाही सांगून परवानगी नाकारली. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माघार घेत देखावा बदलला. नंतर मंडळाचे अध्यक्षांसह सर्वच कार्यकर्ते नॉट रिचेबल झाले.
राज्यातील सत्ताबदलाने सगळ्यांच जनतेच्या मनाचा ठाव घेतला होता. आमदारांचे परराज्यातील दौरे, त्यानंतरचा महाविकास आघाडीचा राजीनामा वगैरे गोष्टींची चर्चा अजून ताजीच आहे. तोच देखावा हे मंडळ साकारणार होते. त्यांनी तशी तयारीही केली होती. नियमाप्रमाणे स्थानिक पोलिस ठाण्याला देखाव्याची कल्पना कळवून तशी परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांकडे गेले होते. त्यांनी अशी परवानगी देण्याचे नाकारले. त्यामागे संघर्षनाट्य उभे केलेलेच आता राज्यात सत्तेवर असल्याचे कारण असावे.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असा देखावा साकार करण्याचा निर्णय त्वरीत मागे घेतला. दुसराच देखावा सादर करू असे ठरले. या कार्यकर्त्यांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे मोबाईलवरून सांगण्यात येत होते.