पुणे : वीज मीटरची मंजुरी मिळण्यासाठी प्रत्येक वीज मीटरसाठी प्रत्येकी ३ हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे उघड झाले आहे. ठेकेदाराकडे १२ हजारांची मागणी करणाऱ्या सहायक अभियंता महिलेविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.हर्षाली ओम ढवळे (वय३८) असे या महिलेचे नाव आहे. महावितरणच्या धानोरी शाखेत ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे विद्युत ठेकेदाराकडे लायझनिंगचे काम करतात. ग्राहकांचे वीज मीटरची मंजुरी मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन महावितरणच्या धानोरी शाखेत ते गेले होते. त्या कार्यालयातील सहायक अभियंता हर्षाली ढवळे यांनी यापूर्वीचे केलेल्या ३ थ्री फेज कामाचे व सध्याचे १ थ्री फेजचे वीज मीटर मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. त्याची २५, २६ व २९ मे रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात वीज मीटर मंजूर करुन देण्यासाठी तडजोडीअंती प्रत्येकी ३ हजार रुपये याप्रमाणे १२ हजारांची मागणी केली होती. त्यानंतर आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन हर्षाली ढवळे हिला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करीत आहेत.