पुणे : ‘मी पानिपत कादंबरी लिहायला पाच वर्षे घेतली. मात्र, त्यावरचा सिनेमा अवघ्या ११ महिन्यांत तयार झाला, मग सिनेमा चालणार कसा? बजेट मिळालं की बनवा सिनेमा असं करून चालणार नाही, त्यासाठी किमान वेळ देणे गरजेचे आहे. 'मुघल ए आझम'ची निर्मिती १२ वर्षे चालली होती. आपण ऐतिहासिक सिनेमा करताना किमान दोन-तीन वर्षे तरी अभ्यास करायला हवा’, असे मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महोत्सवात 'इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये पाटील, ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर, दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे हे सहभागी होते. त्यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, आज ऐतिहासिक सिनेमाची कोंडी झाली आहे म्हणायला हरकत नाही. महाभारत आणि रामायण मालिका आल्या, त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्यांचे लेखक हे प्रतिभावान होते. यामुळे पडद्यावर आलेले चित्रण लोकांना भावले. आज आपल्याकडे घाईत काम करायची सवय लागली आहे. परिणामी, दोन वर्षांपूर्वी ज्या दिग्दर्शकांचे कौतुक झाले, आज त्याची छी-थू होतेय ती याच कारणांमुळे. शेवटी एवढेच म्हणेन की, पेराल तसे उगवते, हे सत्य नाकारता येणार नाही.
दिग्दर्शक व वितरक अनुप जगदाळे म्हणाले, आजघडीला मोठा सिनेमा बनवणे आणि चालवणे हे मोठे आव्हान आहे. कारण पायरसी रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान निर्मात्यांपुढे आहे. ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर म्हणाले, आज मराठी चित्रपटांचे भवितव्य अवघड दिसतंय. कारण पहिल्या दिवशीही प्रेक्षक येत नाहीत. ऐतिहासिक चित्रपट वाढल्याने मराठी चित्रपटांची संख्यात्मक नाही मात्र दर्जात्मक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झाला आहे.