Ajit Pawar:...त्यावेळी मात्र केंद्राने इंधन दरवाढ करू नये; अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:56 PM2022-05-22T17:56:03+5:302022-05-22T17:56:17+5:30
पेट्रोल व डिझेल दर कपातीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, कमी केलेले दर तसेच कमी रहावेत
बारामती : पेट्रोल व डिझेल दर कपातीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, कमी केलेले दर तसेच कमी रहावेत. अन्यथा जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पुन्हा इंधन दर त्याच किंमतीवर आणुन ठेवतील. त्यावेळी इंधन दरवाढ केंद्रांने करू नये, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी पवार यांनी निदर्शनास आणले.
यावेळी पवार म्हणाले, पेट्रोलडिझेल व गॅस सिलेंडर चे दर मोठ्या प्रमाणावर आवाक्याबाहेर गेल्याने जनता हैराण झाली होती. त्यात नाराजीमुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू झाली होती. आम्ही अर्थसंकल्प सादर करताना गॅस सिलेंडर वरील टॅक्स साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणला. राज्य सरकारने १ हजार कोटी टॅक्स न घेण्याचा निर्णय घेत सीएनजी चे दर कमी केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. सर्वसामान्य सीएनजी वाहन चालक, टॅक्सी व रिक्षा चालक यांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता,असे पवार म्हणाले.
महाराष्ट्रासह देशपातळीवर पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने जनतेचा सरकारवरील रोष वाढला होता, या पार्श्वभूमीवर आंदोलने सुरू झाली होती, समाज माध्यमातून नागरिक महागाईच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करत होते. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला असावा. कोणतेही सरकार असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे, अशी परीस्थिती सरकारने निर्माण करावी,असे पवार म्हणाले.