पुणे : यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला आहे. काही भागांत दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे घाट रस्ता बंदही करण्यात आला होता. एक दिवसात तीनशे ते पाचशे मिमी पावसाचा उच्चांक या घाटामध्ये पाहायला मिळाला. आता पावसाचा जोर कमी झाला असून, आता शंभर मिमीच्या जवळपास पाऊस होत आहे.
मुुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफवरील रस्त्याच्या एका बाजूला तडा गेल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता शुक्रवारपासून (दि. २) येत्या सोमवारपर्यंत (दि. ५) हा रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
हे ठिकाण हे ताम्हिणी घाट क्षेत्रात येते. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. तथापि पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ रस्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस
यंदाच्या पावसाळी हंगामात घाटमाथ्यावर जून महिन्यात वरुणराजाने ओढ दिली होती. पण, जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला एका दिवसात शंभर मिमी पावसाची नोंद व्हायची. आता गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तर तीनशे ते पाचशे मिमी पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर वरुणराजा धो-धो बरसला आहे.