खेड शिवापूर : खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांनाही भुर्दंड सोसावा लागणार आहे. टोलनाक्यावर बुधवार दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून सर्व स्थानिक वाहनांकडून ही टोल वसुली करण्यात येणार असल्याची माहिती टोलनाका व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली आहे.
दोन वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी २०२० शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने त्याचबरोबर अन्य राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून खासदार सुळे व आमदार थोपटे, कुलदीप कोंडे माउली दारवटकर व असंख्य आंदोलनकर्त्यांच्या समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन संचालक सुहास चिटणीस , पुणे सातारा टोल रोड प्रा लि चे खेड शिवापूर येथील व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा होऊन पुढील मार्ग निघत नाही तोपर्यंत एम एच १२ व एम एच १४ च्या सर्व वाहनांना टोल माफी देण्यात येईल असे पत्र आंदोलन करताना दिले होते. मात्र दिलेला शब्द यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व टोलनाका प्रशासन यांच्याकडून फिरविण्यात आलेला आहे. त्यावेळी झालेल्या आंदोलनामुळे नागरिकांना टोल नाक्यावरती सवलत देण्यात येत होती मात्र काही दिवसापूर्वी त्यातील पुणे व पिंपरी चिंचवड शहर यांना या टोलमुक्तीतून वगळण्यात आले होते व त्यांच्याकडूनही टोल वसूल करण्यात येऊ लागला होता. असे असताना भोर व वेल्ह्यातील नागरिकांना ओळखपत्र दाखवून टोलमध्ये सूट देण्यात येत होती.
मात्र बुधवार दिनांक १ फेब्रुवारी 2023 पासून सर्व स्थानिक वाहनांकडून ही टोल वसुली करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे खेड शिवापूर टोलनाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघांमधील १३० गावांतील नागरिकांनी स्थानिक मासिक पास काढून घ्यावेत व टोल प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खेड शिवापूर टोल नाका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले असून स्थानिक पास ३१० रुपयेला उपलब्ध आहे. यामध्ये वाहन चालकाने हा पास काढल्यानंतर तो एक महिन्यासाठी ग्राह्य असून यादरम्यान आपण टोलनाक्यावरून कितीही वेळा प्रवास करू शकता अशी माहिती पुणे टोल रोड प्रा लि कंपनीचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी लोकमत शी बोलताना दिली.
एन एच ए आय व रिलायन्स इन्फ्रा यांनी आंदोलनकर्त्यांना टोल माफी संदर्भात जो काही शब्द दिला होता तो जर त्यांनी फिरवला तर स्थानिक नागरिकांचा उद्रेक होईल आणि पुढील घटनेला संबंधित प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे माउली दारवटकर यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला देण्यात आलेला आहे.