पुणे : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) संलग्नित होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे संबोधण्यात येणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा निर्माण करणार आहेत.
राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. त्यासाठी मागील वर्षी निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात या शाळांच्या संलग्नतेसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाला स्वतंत्र अधिकार असतील. त्यानुसार संलग्न शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शाळांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे नामकरण केले जाणार आहे, याबाबतचा शासननिर्णय काढला आहे.‘एमआयईबी’ हे मंडळ नवीन असल्याने सुरुवातीची दहा वर्षे शासनाकडून प्रतिवर्ष १० कोटी रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात मंडळाला दिला जाणार आहे. मंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी १० वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर मंडळ त्यांचे स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करेल. त्यानंतर हे अनुदान बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.