पुणे: भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार प्राज संस्थेचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना आणि गतवर्षीचा २०२२ चा हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा पुरस्कार प्रदान होईल. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता पुरस्कार देण्यात येतील. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील. या कार्यक्रमाची संकल्पना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून, नियोजन निकिता मोघे यांचे आहे. दृकश्राव्य, संगीत, नृत्याविष्कार असा हा कार्यक्रम होईल. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर अटलजींचा जीवनप्रवास आणि कवितांवर आधारित संवाद पुणे निर्मित हा कार्यक्रम आओ फिरसे दिया जलाएं सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य कार्यक्रमाबरोबरच हिंदी नाट्य चित्रपट अभिनेते मनोज जोशी हे अटलजींच्या निवड कवितांचे वाचन करतील. पार्श्वगायिका बेला शेंडे आणि अभय जोधपूरकर हे स्वरबध्द गाणी सादर करतील. सुखदा खांडकेकर आणि नुपूर दैठणकर नृत्याविष्कार सादर करतील. निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी करतील. अटलपर्व हे शिल्पकला, चित्रकला, कॅलीग्राफी, फोटोग्राफी अशा कलांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. त्याचे उद्घाटन शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्या उपस्थित होईल.