पुणे : रात्री उशिरा पिण्याचे पाणी मागून न दिल्याने झालेल्या किरकोळ वादात एकाने आपल्या आत्तेभावालाच विटा आणि सिमेंटच्या दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ८) रात्री साडे अकरा वाजता मुंढव्यातील कामगार मैदानाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या.
राकेश तुकाराम गायकवाड (वय ३५, रा. आनंद निवास, कामगार मैदान जवळ, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, श्रीकांत निवृत्ती आल्हाट (४२, रा. मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष आल्हाट (४६, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. मयत श्रीकांत हा आरोपी गायकवाड याचा आत्तेभाऊ होता. शनिवारी (दि.८) रात्री साडेदहाच्या सुमारास आनंद निवास, मुंढवा येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश गायकवाड हा मयत श्रीकांत आल्हाट याचा आत्तेभाऊ आहे. दोघेही एकमेकांशेजारी राहतात. श्रीकांत हा घरात एकटा राहात होता. मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करायचा. शनिवारी रात्री त्याने दारू प्यायली होती. रात्री उशिरा पिण्याचे पाणी मागण्यासाठी तो राकेश याच्याकडे गेला. त्यावेळी राकेशने पाणी दिले नाही. त्यामुळे श्रीकांत याने त्याला शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने राकेश याने श्रीकांत आल्हाट याला विटा व सिमेंटच्या दगडाने मारहाण केली.
भितींवर जोरात डोके आपटून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात श्रीकांत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी गायकवाड याला मुंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश बोळकोटगी पुढील तपास करीत आहेत.