१० एप्रिलला एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या नास्तिकांचा मेळाव्याला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. तोच मेळावा त्याच सभागृहात २४ एप्रिलला शांतपणे पार पडला. या दोन्ही घटनांची समाजमाध्यमांनी फारशी दखल घेतलेली दिसली नाही आणि तेही साहजिकच आहे. इथे सनसनाटी काही घडणार नव्हते ना!
१० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या तरल असतात आणि त्या फट म्हणता दुखावतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मग रामनवमीनंतर दोन आठवड्यांनी या भावना बधिर किंवा बोथट झाल्या असे समजायचे का? मेळाव्यात झालेली भाषणे चिथावणी देणारी, प्रक्षोभक किंवा देव-देवतांची टिंगल-टवाळी करणारी असती तर धार्मिक भावना दुखावल्या जायला किंवा शांतता भंग करायला कारणीभूत ठरली असती; पण या मेळाव्याचे वातावरण तर एकदमच वेगळे होते.
मेळाव्याला आलेल्या कोणाकडेही लाठ्या-काठ्या, शस्त्रे किंवा झेंडे नव्हते. कोणीही घोषणा देत आले नव्हते. कोणी गटागटाने किंवा झुंडीझुंडीने आले नव्हते. हे विवेकी लोक आपापली वाहने घेऊन किंवा रिक्षातून येत होते आणि शांतपणे सभागृहात जाऊन बसत होते. ते जसे शांतपणे आले तसेच मेळावा संपल्यावर शांतपणे निघून गेले. कुठे गोंधळ नाही, गडबड नाही की घोषणा नाहीत. वक्त्यांनी लोकांना चिथावणी देणारी प्रक्षोभक भाषणे केली असेही काही घडले नाही.
असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबी उलगडून दाखवल्या. सोनावणे यांनी आदिमानवानंतर आलेल्या माणसाने देव कसा आणला आणि देव निर्गुण कसा आहे हे खुमासदार शैलीत सांगितले. सुनील सुकथनकर यांनी कला क्षेत्रातील अंधश्रद्धेची उदाहरणे दिली. थोर विचारवंत आणि विवेकवादी वालावलकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सबंध कार्यक्रमात स्वतःच्या बुद्धीचा वापर, विवेक आणि विचाराला चालना देणारी भाषणे झाली. रामनवमीच्या दिवशीही असाच मेळावा पार पडणार होता; पण विवेकी विचारांवर बंधने घालून आपणच श्रीरामांच्या सर्वसमावेशक धोरणालाच अनवधानाने विरोध करतोय हे विरोधकांच्या लक्षात आले नाही.
शरद बापट, पुणे