पुणे : महापालिकेच्या वतीने क्रीडापटूंचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम अवघ्या दोन दिवसांनी होणार आहे. पण केंद्रीय पर्यावरणमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती महापालिकेच्या ‘क्रीडा समिती’लाच नसल्याचे समोर आले आहे. विशेष असे की आज क्रीडा समितीच्या बैठकीकडेही अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी बैठक तहकूब केली.
क्रीडा समितीचे उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्यांना कडक तंबी द्यावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आजी, माजी दिग्गज खेळाडूंना गोैरविणार असून, खेळाडूंना शिष्यवृत्तीचेही वाटप करणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशअध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. क्रीडाविषयक एवढा मोठा कार्यक्रम असतानाही क्रीडा समितीच्या सदस्यांना या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. तसेच आज क्रीडा समितीची बैठक असताना अधिकारी बैठकीकडे फिरकले नाहीत. आजच्या बैठकीपुढे वर्ल्ड टूर टेनिस चॅम्पियन स्पर्धेसंबधित विषय चर्चेला होते. मात्र, अधिकारी ऑनलाईन अथवा ऑफलाईनही उपस्थित न राहिल्याने बैठक तहकूब करावी लागली.
या दोन्ही बाबी गंभीर असून आयुक्तांनी यापुढे क्रीडा संबंधित कार्यक्रमांची माहिती समितीला आगाऊ देणे तसेच बैठकांना अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अशी मागणी चोरबेले यांनी केली आहे.