पुणे : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आठवडे बाजार बंद केले आहेत. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बहुतेक सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. परंतु गेले आठ - नऊ महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण ठप्प झाले आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने बहुतेक सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील आठवडे बाजार अद्याप सुरू झाले नाहीत. आठवडे बाजारा निमित्त ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते. तसेच शेतकरी आपले शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु हे आठवडे बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेते व छोटे व्यापारी, शेतकरी यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे आठवडे बाजार सुरू करावेत, अशी मागणी येथील विक्रेत्यांकडून जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व मोठ्या गावांमध्ये वेगवेगळ्या वारी हे आठवडे बाजार भरवले जातात. या निमत्त आठवडे बाजारात फळे, भाजीपाला, किराणा सामान, स्टेशनरी, कटलरी, चप्पल, कपडे, बेकरी प्रोडक्ट, खाद्यपदार्थ आदींची खरेदी विक्री होऊन लाखोंची उलाढाल होत असते. यामुळेच आता तरी आठवडे बाजार सुरू करा अशी मागणी जोर धरत आहे.
दसरा गेला आता दिवाळीपूर्व तरी बाजार सुरू करा
दसरा, दिवळी हे सण अनेक लहान -मोठ्या व्यापा-यासाठी पैसे कमविण्याचे दिवस असतात. शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी असूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळेच दसरा गेला किमान दिवाळीपूर्व तरी आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी, छोटे व्यापारी, विक्रेते यांनी केले आहे.