पुणे : ५०० व १००० च्या नोटा चलनामधून बाद केल्यानंतर नवीन नोटांचा भरणा करण्यासाठी तसेच एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी एटीएम दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी दोन दिवस उलटूनही दुपारपर्यंत अनेक बँकांचे एटीएम सुरू न झाल्याने नागरिकांची चांगलीच निराशा झाली.शुक्रवारी दोन दिवस झाल्याने एटीएम सुरू झाले असतील या आशेने अनेक नागरिकांनी सकाळीच एटीएम केंद्रांकडे धाव घेतली. मात्र, एटीएम केंद्रे सुरु नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. दुपारपर्यंत एटीएम सुरु होतील अशी नागरिकांची आशाही फोल ठरली. पुण्यातील बहुतांश एटीएम केंद्रे दुपारपर्यंत बंदच होती. अनेक ठिकाणी नव्या नोटा भरण्याचे काम चालू होते तर अनेक ठिकाणी बँकांकडून कुठलीच हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणाऱ्या पैशांसाठी नागरिकांना बँकांच्या भल्यामोठ्या रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागले. अनेक बँकांतून दोन हजाराच्या नोटा मिळाल्याने आता या नोटा सुट्या कशा करायच्या असा प्रश्न निर्माण झाला.कर्वे रस्त्यावरील अनेक बँकांची एटीएम केंद्र दुपारपर्यंत बंद होती. त्यामुळे अनेक नागरिक खर्चासाठी सुट्टे पैसे नसल्याने हताश झाले होते. एटीएम बंद असल्याने खर्चासाठी पैसे मिळवण्याचा बँक हा एकच पर्याय राहिल्याने तिसऱ्या दिवशीही नागरिकांना बँकांच्या भल्यामोठ्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.(प्रतिनिधी)
एटीएम बंदचा मनस्ताप
By admin | Published: November 12, 2016 7:09 AM