लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गेल्या काही दिवसांपासून विविध बँकांच्या एटीएम केंद्रात खडखडाट जाणवू लागला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रांवर जात होते. दापोडी ते पिंपरी या दरम्यान कोणत्याच एटीएम केंद्रावर कॅश उपलब्ध नव्हती. एका एटीएममध्ये नाही, काही अंतर पुढे गेल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील, या अपेक्षेने अनेकांनी ठिकठिकाणच्या एटीएम केंद्रांना भेट दिली. सैरभर धाव घेतल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेच्या कारभारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा प्रत्यय पदोपदी येऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकाच्या एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. बँकांना सलग दोन ते तीन दिवस सुट्या आल्यानंतर एटीएममध्ये कॅशचा भरणा केला जात नाही. नागरिकांना त्यामुळे पुढील काही दिवस गैरसोईचे जातात. सुटीच्या काळात बँकांमधून रक्कम काढता येत नाही. एटीएम केंद्रातही पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे ऐनवेळी तारांबळ उडते. एटीएममध्ये २४ तास पैसे उपलब्ध होणे आवश्यक असते. असे असताना कोणत्याही एटीएममध्ये पैसे काढता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वत्र ही परिस्थिती पहावयास मिळाली.
सुटीच्या दिवशीही एटीएम केंद्र बंदच
By admin | Published: May 15, 2017 6:41 AM