लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एटीएम सेंटरमधील मशिनमध्ये तुम्ही कार्ड टाकून पाहिजे तेवढ्या पैशांची एंट्री केली की, तेवढेच पैसे तुम्हाला मिळतात. पण एका आधुनिक बंटी-बबलीने हे एटीएम मशिनच हॅक करून १ हजार रुपयांच्या ५० ट्रांझॅक्शनद्वारे तब्बल १० लाख रुपये काढून बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे त्यांनी शिवाजीनगर येथील कॅनरा बँकेच्याच एका एटीएम सेंटरमधून ५ लाख रुपये काढले होते. तसेच विमाननगर व धायरी येथील एटीएममधून त्यांनी काही हजार रुपये लंपास केले आहेत.
शिवाजीनगर येथील स्नेहा सेंटरमधील कॅनरा बँकेच्या एटीएममधून या दुकलीने १८ मार्च रोजी ५ लाख रुपये काढून फसवणूक केली होती. त्याचप्रकारे त्यांनी आदल्या दिवशी १७ मार्च रोजी मार्केट यार्ड येथील प्रवेशद्वार क्रमांक ४ येथे असलेल्या कॅनरा बँकेच्या एटीएम मशिनमधून १० लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे.
कॅनरा बँकेचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे. बंगळुरूच्या कार्यालयातून पुण्यातील मुख्य कार्यालयात १७ मार्च रोजी मार्केट यार्ड येथील एटीएम केंद्रावर संशयास्पद व्यवहार झाल्याचा ई-मेल आला. त्यानंतर बँकेचे सुरक्षा अधिका-यांनी एटीएम केंद्रावर धाव घेतली. त्यांनी त्या दिवशीचे व्यवहार तपासले. या एटीएम सेंटरमध्ये आदल्या दिवशी १७ लाख रुपये भरले होते. पण त्यापैकी १० लाख रुपये काढल्याची नोंदच झाली नसल्याचे आढळून आले. त्यांनी एटीएम केंद्रामधील सीसीटीव्ही पाहिले असता त्यांना एक महिला व पुरुष यांनी रात्री दहाच्या सुमारास एका तासाभराच्या आत १० लाख रुपये काढून नेल्याचे दिसून आले.
या प्रकरणी शेकू देह राठोड यांनी मार्केट यार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कॅनरा बँकेच्या मार्केट यार्ड येथील एटीएम सेंटरमध्ये १७ मार्चला रात्री १० वाजता एक पुरुष व महिला आले. पुरुषाच्या पाठीवर सॅक होती. त्याने सॅकमधून काही तरी वस्तू काढून एटीएम मशिनच पाठीमागे गेला. त्यानंतर त्याने मशिनमध्ये एक कार्ड टाकले. त्यानंतर लागोपाठ ५० ट्रांझॅक्शन करून तब्बल १० लाख रुपये काढून ते दोघे पसार झाले.