सुपे :बारामती तालुक्यातील सुपे एसटी बसस्थानक नजीक असलेल्या टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएममधील एटीएम मशीनसह सुमारे ८ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना शुक्रवारी ( दि. १० ) पहाटे घडली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे फुटेज घेऊन योग्य दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
येथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून एटीएम मशीनसह अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनात टाकून उंडवडीच्या दिशेने पोबारा केला. यावेळी नारोळी गावानजीक एटीम मशीनचा काही भाग टाकून दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी उंडवडीवरून रावणगाव बोरीबेल रस्त्यावरील घाटात असलेल्या गटरात एटीएम मशीन लपविण्याचा प्रकार केला. मात्र पहाटेच्या वेळी व्यायामासाठी आलेल्या तरुण मुलांनी चोरट्यांचा डाव उधळून लावला.
रावणगाव येथील तरुण कार्यकर्ते बाळदत्त आटोळे, कुमार चव्हाण, गणेश गावडे यांच्या सतर्कतेमुळे चोरी उघडकीस आली. या कार्यकर्त्यांमुळे चोरट्यांचा घाटात एम एच १२ अशी पासिंग असणारी चार चाकीमधून एटीएम मशीन काढून गटरात लपवण्याचा डाव फसला. तसेच चोरट्यांनी तरुणाना पाहाताच धूम ठोकली.
त्यानंतर रावगाव येथील कार्यकर्त्यांनी दौंड पोलिसांना माहिती देताच पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस हवालदार पांडुरंग थोरात, गोरख मलगुंडे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एटीएम मशीन ताब्यात घेऊन हा प्रकार सुपे येथील घडला असल्याचे सांगण्यात आले.
सुपे येथील घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी भेट दिली असून दौंड पोलिसांकडूून एटीएम मशीन ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुपे येथील पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख करीत आहेत.