लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : येथील परिचारिकेच्या मोबाईलवर फोन करून एटीएम व आधार कार्डची माहिती घेऊन परिचारिका व तिच्या पतीच्या खात्यातील साडेबारा हजार रुपये लंपास केल्याची घटना वाघोली येथील खांदवेनगर परिसरामध्ये घडली. तीन दिवसांत नागरिकांना फोन करून एटीएमची माहिती विचारून रक्कम लंपास केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा लोणीकंद पोलिसांत दाखल झाला आहे.वाघोली येथील खांदवेनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मागे राहणाऱ्या एका परिचारिकेला सोमवारी (दि. ८) व मंगळवार (दि. ९) रोजी अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनद्वारे परिचारिकेकडून तिच्या व पतीच्या एटीएम, आधार कार्डची माहिती घेतली. यानंतर परिचारिकेच्या खात्यातील ४ हजार ६०० रुपये व तिच्या पतीच्या खात्यातील ८ हजार रुपये परस्पर काढून घेतले. खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याने लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आठवड्यामध्ये वाघेश्वर सोसायटीतील एका वृद्धाला रविवारी (दि. ७) रोजी अशाचप्रकारे एटीएमची माहिती विचारून ५० हजार रुपये लंपास करण्यात आले होते. या घटनेनंतर पुन्हा दोन दिवसांतच परिचारिकेला फोनद्वारे माहिती विचारून फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
‘एटीएम’द्वारे परिचारिकेचे पैसे लंपास
By admin | Published: May 12, 2017 5:29 AM