पुणे : राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच आता पुणे शहरातही कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस (मात्रा) घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार नाही. असे आदेश सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करताना राज्यात पुणे शहर वगळता इतरत्र कुठेही दोन डोस घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना चाचणी बंधनकारक नव्हती़ मात्र केवळ पुणे शहरातच ही चाचणी आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्तांनी शनिवारी आपल्या आदेशात नमूद केले होते. तर राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांनी या चाचणीची आवश्यकता नसल्याचे आपल्या आदेशात नमूद केले होते.
शाळा सुरू होताना महापालिका स्तरावर व राज्य स्तरावर या दोन वेगवेगळ्या आदेशामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.परिणामी सोमवारी महापालिकेच्या सहा माध्यमिक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
दरम्यान सायंकाळी हा संभ्रम दूर करण्यात आला असून, आयुक्तांनी नव्याने काढलेल्या आपल्या आदेशात लसीचे दोन डोस घेतलेल्यांना चाचणीची अट दूर केली आहे. मात्र ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास, संबंधिताने आरटीपीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.