पुणे :शिरूर तालुक्यात विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाणार नाही. तसेच असे कृत्य करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी असाच आमचा आहे. फक्त या गंभीर घटनेमध्ये कसल्याही प्रकारचे राजकारण आणू नये , असे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. महिलेच्या कुटुंबियांची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.
कोल्हे म्हणाले, या दुर्दैवी घटनेत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. ते पूर्ववत होण्याची शक्यता कमी दिसतेय. पण या महिलेचे पुढे योग्य पुनर्वसन करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल. माझ्या मतदारसंघातील घटना आहे. त्यामुळे या घटनेचा मी सातत्याने आढावा घेत आहे.
पुण्यासाठी ही अशोभनीय घटना: प्रवीण दरेकर पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसात अशा घटना अनेक घडल्या आहेत. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे. एखादा डोळा तरी पूर्ववत करावा, त्यासाठी मी स्वतः यंत्रणेशी संपर्कात राहणार आहे. एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा. तसेच काबाडकष्ट करूनपोट भरणारा परिवार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत. पुण्यासाठी ही अशोभनीय घटना आहे. आमची मान शरमेने खाली जायला लावणारी ही घटना आहे असेही दरेकर म्हणाले.
जखमी महिलेच्या पतीने सांगितले, आम्ही न्हावरे येथे गेली १५ वर्ष राहायला आहे. आमचा घरोघरी जावून भांडे विकण्याचा व्यवसाय आहे.त्यावर आमचे कुटुंब चालते. माझ्या दोन मुलींचे लग्न झाले असून दोन मुले लहान आहे. पण माझ्या पत्नीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेत तिचे डोळे काढण्यात आले. मला तुमचे धन दौलत काही नको आहे. फक्त माझ्या पत्नीचे डोळे परत यावे जेणेकरून मी तिच्यासोबत जगून शकेल. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.