पुणे : सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंढे यांच्याबरोबर परस्पर सहमतीने संबंध असलेल्या करुणा शर्मा हिच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा येथे राहणाऱ्या एका २३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरुन तिचे पती व करुणा शर्मा हिच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे उस्मानाबाद येथे रहायला होते. त्यांना एक मुलगी आहे. नोव्हेबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा हिच्याबरोबर झाली. ती स्वत:ची ओळख करुणा मुंढे अशी करुन देते. फिर्यादीचे पती वारंवार तिच्या घरी जाऊन राहू लागले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. सतत करुणा शर्मा हिच्याशी बोलत असत. तिने विचारणा केल्यावर त्याने तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा छळ करु लागला. मी करुणाबरोबर लग्न करणार आहे. तू मला घटस्फोट दे, असे सांगून फिर्यादीला त्यांच्या आईच्या घरी सोडले. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांच्या घरी येऊन फिर्यादीवर पतीने बळजबरी केली. २४ एप्रिल रोजी तिला कार्यक्रमाला जायचे असे सांगून भोसरीला नेले. तेथे करुणा शर्मा हिने हॉकी स्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या शोधासाठी त्या ३ जून रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथील ग्रीन इमारतीत करुणा शर्मा हिच्या घरी केले. तेथे तिच्या पतीने करुणा शर्मा हिला फोन लावला. तिने जातीवाचक शिवीगाळ करुन पतीला घटस्फोट दे, नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव तपास करीत आहेत.