लोणीकाळभोर : पुणे जिल्हा ट्रोसिटी विशेष न्यायालय यांच्या आदेशाप्रमाणे लोणी काळभोरपोलिस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचा-यांवर हडपसर येथील पोलीस स्टेशनमध्ये अनूसुचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विजय गायकवाड (वय ३९ ,रा.मार्केट यार्ड पुणे) यांनी फिर्याद दाखल केली असुन, हडपसर पोलीस स्टेशन मध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस हवालदार सोमनाथ क्षीरसागर व पोलीस शिपाई शिरीष कामठे यांच्या विरोधात शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालु असलेले बेकायदेशीर अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे व त्या अवैध धंद्याचे बेकायदेशीर हप्ते वसुल करणारे पोलीस हवालदार सोमनाथ क्षीरसागर ,पोलीस शिपाई शिरीष कामठे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व इतर विविध मागण्या करिता रिपब्लिकन परिवर्तन सेना प्रदेशाध्यक्ष विजय गायकवाड यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले होते.हलगीनाद आंदोलन गायकवाड करणार असल्याने त्याचा राग मनात धरुन क्षीरसागर व कामठे यांनी दिनांक ७ सप्टेंबर या दिवशी ऑनड्युटी असताना गायकवाड यांना वारंवार फोन करून हडपसर येथे बोलावले. यावेळी साध्या गणवेशात आलेले कामठे व क्षीरसागर यांनी गायकवाड यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने त्या दोघांनी त्यांचा अपमान करुन जातीवाचक अपशब्द वापरुन आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकला. यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही. आपल्या तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याने गायकवाड यांनी पुणे जिल्हा अॅट्रोसिटी विशेष न्यायालय या न्यायालयमध्ये न्याय मिळण्यासाठी अॅट्रोसिटी कायद्याअंर्तंगत व इतर भारतीय संविधान कायद्याअंतर्गत खटला दाखल केला. यावर न्यायालयाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोमनाथ क्षिरसागर व पोलीस शिपाई शिरीष कामठे यांच्या विरोघात अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर करीत आहे.