पुणे : लष्कर ए तोएबा (एलईटी)या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला मोहम्मद जुनैद खान हा तरूण फेसबुकच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. या संघटनेसाठी तीन ते चार वेळा काश्मीरला जाऊन आला आहे.
जुनेद खानच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले होते. त्याने दहा हजार रूपये काढल्याचे समोर आले असून, महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन त्याने रेकी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुढील तपासासाठी जुनैदला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली असून, या कालावधीत जुनैदला काश्मीरला घेऊन जाण्याची शक्यता आहे.
भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जुनैद ला बंदी असलेल्या एलईटी या संघटनेत भरती करण्यात आल्याचे दहशतवादी विरोधी पथकाने उघडकीस आणल्यानंतर त्याला अटक करून मंगळवारी दुपारी नावंदर कोर्टात हजर करण्यात आले. विधिसेवा प्राधिकरणामार्फत जुनैदला यशपाल पुरोहित वकील देण्यात आले आहेत.
ब्रेनवॉश केल्याचा संशय
बचाव पक्षाचे वकील म्हणून त्यांनी जुनैदच्या बाजूने युक्तिवाद करताना या तरूणाचा 'ब्रेनवॉश' करण्यात आला असून, तो कुठल्या संघटनेसाठी काम करतोय हे त्याला माहितीच नाही. त्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. जुनैद हा लष्कर ए तोएबा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेकरिता नवीन सदस्याची भरती करण्याकरिता आर्थिक पुरवठा करणे, दारूगोळा व शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे अशा अवैध कृत्य करीत असून जुनैद मार्फत त्यांचे मॉड्युल बाबत माहिती एटीएसला घ्यायची आहे.
गर्दीच्या ठिकाणी घातपात, दहशतवादी कृत्ये
प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले होते का ? याचाही शोध घ्यायचा आहे. जुनैद आणि त्याचे साथीदार भारतातील गर्दीच्या ठिकाणी घातपात व दहशतवादी कृत्य घडवून आणणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्याने भारतातील मर्मस्थळांची, संरक्षण दल तसेच देशातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली असण्याची शक्यता आहे. फरार आरोपींना देखील अटक करायची आहे. जुनैदचा भारतातील इतर राज्यातील व्यक्तींशी देखील संपर्क झाला असल्याचेप्रथमदर्शनी दिसून येत आहे, असा युक्तिवाद करीत जुनैदला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.