पुणे : जमिनीच्या वादातून प्रभात रस्त्यावर दोघांनी एका महिला वकिलासह बिल्डरवर कोयत्याने वार केला. ही घटना डेक्कन पोलीस ठाण्यासमोरील दत्त बिल्डिंगमधील कृष्णा एंटरप्रायजेसच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली़ पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे़अजित गणपत गोगावले (वय ४५, रा़ मांजरी, हडपसर) आणि अमित अरुण वाल्हेकर (वय ३१, रा़ गणराज कॉलनी, काळेवाडी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत़ या हल्ल्यात कृष्णा ऊर्फ बापू तुकाराम शेटे (वय ७२, रा़ बुट्टेपाटील क्लासिक, प्रभात रोड) आणि अॅड़ नेहा नितीन जाधव (वय ४७, रा़ वकीलनगर, एरंडवणा) हे जखमी झाले आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे यांचे डेक्कन पोलीस ठाण्यासमोर गल्लीत कृष्णा एंटरप्रायजेस नावाचे कार्यालय आहे़ त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे़ नेहा जाधव त्यांच्या कार्यालयात काम करतात़अजित गोगावले व अमित वाल्हेकर यांनी भोरमधील एका जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांना ५५ लाख रुपये दिले होते़ परंतु, शेटे यांनी हा व्यवहार पूर्ण केला नाही आणि त्यांचे पैसेही परत दिले नाही़ त्यामुळे संतापलेले दोघे तीन कोयते घेऊन आज सकाळी अकराला कार्यालयात आले होते़ पावणेबाराच्या सुमारास शेटे कार्यालयात आले़ व्यवहाराविषयी त्यांनी नीट उत्तर न दिल्याने त्यांनी शेटे यांच्या डोक्यात, तोंडावर कोयत्याने वार केले़ त्यांना वाचविण्यासाठी नेहा जाधव या मधे आल्या़ त्यांच्यावरही हल्ला केला़ त्यांच्या करंगळीजवळील बोट तुटले़ त्यानंतर हल्लेखोर पळून गेले़ घटना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले़सायंकाळी साडेपाचला दोघांनाही अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक एस. के. सोनवणे अधिक तपास करीत आहेत़
महिला वकिलासह बिल्डरवर हल्ला, प्रभात रस्त्यावर भरदिवसा घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 5:49 AM