अमोल कोल्हेंच्या रॅलीत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:24 PM2019-04-10T12:24:55+5:302019-04-10T12:26:08+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची रॅली रविवारी दुपारी ४ वाजता चिंतामणीनगर, सय्यदनगर येथे चालू होती़.
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वानवडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या वादातून एकाला कोयत्याने व हॉकी स्टीकने मारहाण करण्याची घटना हडपसरमधील ससाणे लॉन्ससमोर रविवारी घडली़.
याप्रकरणी वानवडीपोलिसांनी अफान फारुख इनामदार, सुफियान फारुख इनामदार, अलताज ऊर्फ गजक्या व इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़चौघांना अटक केली आहे़.
याप्रकरणी अन्वर शमशुद्धीन इनामदार (वय ३०, रा़ सय्यदनगर, मंहमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अन्वर इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची रॅली रविवारी दुपारी ४ वाजता चिंतामणीनगर, सय्यदनगर येथे चालू होती़. यावेळी अन्वर इनामदार आणि अफान इनामदार, सुफियान इनामदार यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन किरकोळ वाद झाला होता़. तो त्यांनी आपआपसात मिटविला़ रॅली संपल्यानंतर अन्वर इनामदार व त्याचे मित्र ताजुउद्दीन पठाण, निझाम शेख व अमनअल्ला सय्यद असे सायंकाळी ७ वाजता ससाणे लॉन्स समोर चहा पित बसले होते़. त्यावेळी सुफियान इनामदार, अफान इनामदार हे हातात कोयत्यासारखे हत्यार व हॉकी स्टीक घेऊन आले़. सुफियान इनामदार याने कोणीही मध्ये यायचे नाही़, कोणाच्या नादी लागला आहे तुम्हाला दाखवितो, असे म्हणून ते सर्व जण अन्वरच्या अंगावर धावून गेले़. सुफियान याने अन्वरवर कोयत्याने वार केला़ तो अन्वर याने हुकविला़ त्यानंतर अलताज याने हॉकी स्टीकने त्यांना मारहाण केली़, ही मारामारी पाहून हॉटेलमधील लोक बाहेर गेल्यावर तेथील लोकांनी हॉटेलचे शटर बंद करुन अन्वरला त्यांच्यापासून वाचविले़. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. वरपडे करत आहेत.