पुणे/येरवडा : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर शाळेच्या आवारातच घुसून चाकूने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना वडगाव शेरी येथे सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या गंभीर घटनेनंतर या तरुणाने विष प्राशन करून स्वतःवर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी ‘नाही’ म्हणते, म्हणजे ‘नाही’च असते, हे आजकालच्या मुलांना कळणार तरी कधी? आणि हा प्रश्न परीक्षेत विचारणार तरी कधी? या घटनेमुळे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मुलीची परीक्षा मंगळवारी सुरू होणार होती; पण तिला आता परीक्षेला मुकावे लागणार आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपी कपिल भट (२२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध (पोस्को) बाललैंगिक अत्याचारासह, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडगाव शेरी येथील इनामदार हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ होता. यावेळी कपिल भट याने शाळेच्या आवारात आला. त्याने या मुलीला बाहेर बोलावले. तिला आवारात बाजूला घेऊन जात माझ्याशी बोलत का नाही, मला फसविले, असे म्हणून त्याने तिच्या पोटात चाकू खुपसला. तिच्या मनगटावरही त्याने वार केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने शिक्षक आणि विद्यार्थी घाबरले. तिच्यावर वार करून भट पळून गेला. रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे तसेच हाताच्या मनगटाची शीरदेखील कापली गेली आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी पुण्यातील मोठ्या खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाचा शोध सुरू झाला.
विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
या मुलीवर हल्ला करून भट हा बाहेर निघून गेला. त्यानंतर त्याने रस्त्यात स्वतःच्या अंगावर सपासप वार करून घेत विषप्राशन केले. जखमी अवस्थेत त्याला खराडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगी व आरोपी हे पूर्वी शेजारी राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये मतभेद झालेले होते त्या रागातून व एकतर्फी प्रेमातून त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर थेट प्राणघातक हल्ला केला. या गंभीर घटनेमुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्याला हवी असलेली वस्तू किंवा व्यक्ती न मिळाल्याने काही व्यक्तींमध्ये मत्सर निर्माण होतो. बरेचदा नकार पचवण्याची ताकद नसल्याने रागातून अशी कृत्ये केली जातात. आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीने नकार दिल्यास स्वाभिमानाला धक्का लागल्याची जाणीव तीव्र होते. अँटिसोशल पर्सनॅलिटी, इम्पलसिव्ह पर्सनॅलिटी असे व्यक्तिमत्त्व दोष असलेल्यांकडून दुसऱ्यांना इजा करण्याचे टोकाचे पाऊल उचलले जाते. भावनिकदृष्ट्या असलेली अस्थिरताही यास कारणीभूत ठरते. आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये यापैकी कोणताही दोष दिसत असेल तर पालकांनी वेळीच यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यांमध्ये गुन्हा सिध्द होऊन अटक झाल्यावर तुरुंगातही मानसोपचार देण्याचा प्रयत्न केला जातो.
- डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ
संवाद साधा, धोका टाळा-
आरोपी सज्ञान असल्यास आयपीसीच्या नियमांप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. आजकाल एकतर्फी प्रेमातून हल्ला होण्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळतात. हल्ले अचानक होत नाहीत, तर आधीपासून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याबद्दल कोणाशीही बोलायला मुलींना भीती वाटते. बरेचदा मुली याबाबत संवाद साधत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत. घरी काही सांगितल्यास आपली शाळा किंवा बाहेर पडणे बंद होईल, आपल्याला समजून घेतले जाणार नाही, अशी त्यांना भीती असते. मुलींनी अशा परिस्थितीत विश्वासातील व्यक्तींशी बोलले पाहिजे. आई-वडील, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अशा कोणत्याही विश्वासार्ह व्यक्तींशी संवाद साधल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.
- नंदिता अंबिके, सामाजिक कार्यकर्त्या