ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होत नाही. तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी मंजूर झाली असून, आजपर्यंत फक्त निधी मंजूर झाल्याच्या घोषणा झाल्या होत्या. सध्या निधीही पडला असून, लवकरच शुभमुहूर्त काढून सफारीच्या कामाला सुरुवात करावी, असे गावागावांतील ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
जंगलतोड झाल्यामुळे तसेच भक्ष मिळत नसल्याने बिबट्या सध्या गावागावांत पाहायला मिळत आहेत. आता तर बिबट आणि मनुष्य असा संघर्ष वारंवार घडत आहे. पुन्हा एकदा सोमवारी (दि. ४) सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ओतूर पाथरटवाडी येथील समीर घुले हे पत्नी अश्विनी समीर घुले (वय २६) यांच्यासमवेत आपल्या मोटारसायकलवरून ओतूर येथे जात असताना कॅनॉल लगत असलेल्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले. ही माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गीते, वनरक्षक विश्वनाथ बेले व फुलचंद खंडागळे यांच्यासमवेत विशाल घुले, सुधाकर घुले, अमोल गीते, अजय मालकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन उपचार केले. पुढील उपचारासाठी जुन्नर येथे नेण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार कॅनॉल लगत पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ओतूर परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र येत असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर लाईट लावणे, समूहाने फिरणे, सोबत बॅटरी व मोबाईलवर गाणी वाजवणे, आपले पशुधन सुरक्षित गोठ्यात ठेवणे तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना व ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याची तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.