पुणे : भाड्याने दिलेली जागा बळकावून टोळक्याच्या मदतीने मावस भावाने तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून घराबाहेर लावलेल्या दोन मोटारसायकली, रिक्षा व कारची तोडफोड केली. त्यानंतर दहशत माजविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सागर दगडू बराटे (३८, रा. वारजे गाव) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोपी ऊर्फ विजय साष्टे (३९, रा. दत्तनगर, वारजे) या मावसभावाला अटक केली. यश विजय साष्टे, कार्तिक कांबळे (रा. रामनगर), आकाश ऊर्फ तितल्या मुलजे, प्रतीक ऊर्फ राणा क्षीरसागर, अमित, विशाल व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बराटे हे इमारत बांधकामाचा व्यवसाय करतात. त्यांनी ते राहत असलेल्या शेजारी त्यांचा मावस भाऊ विजय साष्टे याला १० बाय १०चे दुकान प्रति एक हजार रुपये भाड्याने दहा वर्षांपूर्वी दिले होते. त्याने ते बळकाविले. त्याबद्दल त्यांचा न्यायालयात वाद चालू आहे. गेल्या दोन दिवसांपासून विजय व त्याचा मुलगा यश जागेच्या कारणावरून वाद घालत आहेत. रविवारी रात्री साडेनऊ वाजता विजय, त्यांचा मुलगा यश व त्यांच्या परिसरात दहशत माजविणारे कार्तिक कांबळे व इतर हातात कोयते, दगड घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक केली.
हे पाहून फिर्यादी बाहेर आले असताना आकाश याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला. परंतु, तो वार फिर्यादीने चुकविला. तेव्हा त्याचा कोयता पत्र्याच्या शेडमधील पत्र्यात अडकून बसला. त्यामुळे फिर्यादी यांचा जीव वाचला. यावेळी विजय, यश, कार्तिक यांनी कोयत्याने फिर्यादी यांची मावशी आशा जाधव यांच्या मुलांच्या दोन गाड्या फोडल्या. तसेच इतरांनी पार्क केलेल्या रिक्षा व कार यांच्यावर दगड मारून त्या फोडल्या. त्यांना रोखण्यासाठी काही रहिवासी व रिक्षाचालक आले असताना त्यांना आकाश याने धमकावले. कोणी पुढे आला तर खांडोळी करून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे लोक घाबरून पळून गेले. ही संधी साधून फिर्यादी त्यांचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेले.