पुणे - शहरातील येरवडा परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. अति रक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने पुणे शहर हादरले आहे.नेमकं काय घडलं?दैनिक कामकाज संपवून ही २८ वर्षीय महिला संध्याकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या वाहनतळावर आली. तिथेच महिला व तिचा सहकारी असलेला कृष्णा कनोजा (२८) यांच्यात वाद झाले. महिलेसोबत वाद झाल्यावर कृष्णा इतका संतापला की त्याने कोयत्याने सपासप वार करत तिला जखमी केलं. महिलेनं आरडाओरडा केला, ज्यामुळे तिथले सुरक्षारक्षक त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कृष्णाला अटक करण्यात आली.
'कलीग'नेच घेतला जीव या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी उघडकीस आणले की आरोपी आणि पीडितेचे दोघेही 'WNS' कॉल सेंटरमध्ये काम करत होते. कृष्णा आणि शुभदा यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला होता. वाद इतका वाढला की कृष्णाने त्या महिलेवर हल्ला केला.पोलिसांनी आरोपी कृष्णाला रात्री उशिरा अटक केली. त्याने कोयता लपवून आणला होता, त्याला कोयता नेमका कुठून मिळाला याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जात आहे. २८ वर्षीय मयत महिला, पुणे-सातारा रस्त्यावर असलेल्या बालाजी नगर भागात राहत होती. ती येरवड्यातील 'WNS' कॉल सेंटरमध्ये काम करत होती. उपचारादरम्यान, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास
येरवडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपी कृष्णा कनोजा, याची न्यायालयाने दि. 13/01/2025 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, आरोपीच्या आणखी काही संदिग्ध कृत्यांबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या नेतृत्वात तपास चालू आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.