पुणे - वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादातून एकाला तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री येरवड्यात घडली. विजय गणपत रणसुरे(वय 32,रा नवी खडकी येरवडा) याला या घटनेत गंभीर मारहाण झाली आहे. या प्रकरणी शिव वाहतूक सेनेचा अध्यक्ष बापू खरात, स्विकृत सदस्य राकेश चौरे, गणेश मोरे, स्वप्नील कांबळे यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बापू खरात याने विजय याला शास्त्रीनगर पाण्याच्या टाकीजवळ बोलाऊन घेतले. राकेश चौरे याच्या पत्नीसोबत का बोलतो या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. याचवेळी खरात याच्यासह चौरे, गणेश व स्वप्निल यांनी विजय याला लाथा बुक्यांनी मारहाण करीत तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत विजय याने येरवडा पोलिस स्टेशन गाठले. येरवडा पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनास्थळी जाऊन चौघांना ताब्यात घेतले. येरवडा पोलिसांनी चार आरोपी विरुध्द तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या गुन्ह्यातील बापू खरात हा पूर्व रेकाँर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.सध्या शिवसेना प्रणीत शिव वाहतूक सेनेचा तो पुणे शहर अध्यक्ष आहे. राकेश चौरे हा येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचा स्विकृत सदस्य आहे. सदरची गुन्हयाची गंभीर घटना घडल्या नंतर येरवडा पोलिस स्टेशनला अनेक राजकीय पुढारी, नगरसेवक, माथाडी नेते तसेच पूर्व रेकाँर्डवरील गुन्हेगारांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे करीत आहेत.