राजगुरुनगर : गावठी दारूधंद्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावातील जमावाने जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड गंभीर जखमी झाले. ही घटना खंड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.खेड तालुक्यातील पश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि.१) सकाळी २३ पोलिसांचे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. पाच अड्डे उद्ध्वस्त केले. १३ जणांवर कारवाई करून पोलिसांच्या गाडीत बसविले. तसेच एका घरात पिंजºयात ठेवलेल्या शेकरू या प्राण्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, गावातील ग्रामस्थ महिलांनी ‘आमची माणसं घेऊन जाऊ नका’, असे सांगत पोलिसांची गाडी अडवली. अचानक जमाव आक्रमक झाला. हातात कोयते, गज, लाकडी दांडके, दगड घेऊन पोलिसांवर हल्ला केला. १५ मिनिटे पोलीस होमगार्ड व जमाव यांच्यामध्ये झटापट, मारहाण सुरू होती.यामध्ये पोलीस व होमगार्ड यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक आदित्य लोणीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून रक्तबंबाळ केले. त्यांच्या डोक्याला दोन टाके पडले आहेत. होमगार्ड जयंवत कोहिनकर यांच्या डोक्यालाही १० टाके पडले. पोलीस कर्मचारी संदीप भापकर, राजेश नलावडे यांना जोरदार मारहाण केली. होमगार्ड महिला रूपाली शिंदे, संध्या शिंदे, अश्विनी सांडभोर व दोन महिला पोलिसांच्या डोक्याच्या केसांच्या झिंज्या ओढून फरफटत नेऊन मारहाण केली. पोलीस गाडीवर दगडफेक करून गाडीचे दार तोडून ती पेटविण्याचा प्रयत्न केला.याबाबत पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले आहे. ४ हजार ५०० रुपायांची गावठी दारू बनविण्याची रसायने, २ हजारांची तयार दारू, एक शेकरू प्राणी ताब्यात घेतले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, पोलीस निरिक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.गुंड प्रवत्तीचे लोक अवैध दारू बनवून विक्री करत असतील तर अशा लोकांना आम्ही अजिबात सोडणार नाही. आजचा झालेला प्रकार खूपच निंदनीय आहे. माझ्या पोलीस कर्मचाºयांनी जी कारवाई केली ती योग्य आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे अवैध गावठी दारू बनवून विक्री केली होती. त्यामध्ये अनेक लोकांना विषबाधा होऊन मृत्यू पावले होते. कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी अपुरे असल्यामुळे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांच्यावर कायदेशीर नियमानुसार कठोर कारवाई करणार आहे.- सुवेझ हक, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
पोलिसांवरच हल्ला!, गावठी दारूधंद्यावर कारवाईसाठी गेले होते पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:31 AM